व्यावसायिक वाहन नोंदणीसाठी १५ वर्षांचा रहिवासी दाखला सक्तीचा करा; सुदीप ताम्हणकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
………………………………………………………………..
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)
गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालक, बसमालक आणि लहान वाहतूक व्यावसायिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ठोस कायदेशीर उपाययोजना कराव्यात. व्यावसायिक वाहन नोंदणीसाठी १५ वर्षांचा रहिवासी दाखला सक्तीचा करावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. यासाठी गोवा मोटार वाहन नियम, १९९१ मधील नियम ५-अ मध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गोव्यात परराज्यातील व्यक्ती, मोठ्या खासगी कंपन्या, विद्यापीठे आणि इतर संस्थांकडून वाहनांची नोंदणी व व्यावसायिक वापर वाढत असल्याने स्थानिक वाहतूक व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा येत असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला आहे. विशेषतः टॅक्सीचालक, पर्यटक बसमालक, स्वयंरोजगार करणारे चालक आणि छोट्या वाहतूक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक वाहतूक व्यवसाय टिकविण्यासाठी व्यावसायिक वाहन नोंदणी करताना १५ वर्षांचा रहिवासी दाखला, मतदार ओळखपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करावी. परराज्यातील कंपन्या व संस्थांच्या वाहन नोंदणीवर मर्यादा घालाव्यात. तसेच परराज्यात नोंदणीकृत खासगी वाहनांचा गोव्यात अनधिकृत व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कॅसिनो कायद्याचा दाखला
ताम्हणकर यांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या शुक्र सुदिन सिनाई उसगावकर विरुद्ध गोवा सरकार या प्रकरणातील निकालाचा दाखला दिला आहे. कॅसिनो प्रवेशाबाबत स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यात कायदेशीर वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर स्थानिक वाहतूक व्यावसायिकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठीही सरकारने कायदेशीर तरतुदी कराव्यात, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
गोमंतकीय वाहतूक व्यावसायिकांचा रोजगार आणि आर्थिक स्थैर्य टिकविणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे परिवहन खात्याला नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली आहे.





