शिष्टमंडळाची आरोग्य संचालकांना भेट
गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पेडणे
पेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न इस्पितळाच्या नावाने उभारलेली भव्य इमारत गेली सात वर्षे धुळ खात पडली आहे. आता तुये सामाजिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर या इमारतीत करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवून, हे इस्पितळ तातडीने सुरू करावे अन्यथा पेडणे तालुक्यात मोठे आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा तुये जीएमसी संलग्न इस्पितळ कृती समितीने केली आहे.
समितीच्या शिष्टमंडळाने आज आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रूपा नाईक यांची भेट घेतली. जनतेच्या पैशांचा अपव्यय सुरू असून भव्य इमारत विनावापर पडल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. मोठ्या प्रमाणात सामुग्री तिथे आणून ठेवण्यात आली असून ती खराब होत आहे. वातानुकुलीत यंत्रणा निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इस्पितळासाठी विनाखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मात्र इमारतीचा वापर न होताच दर महिन्याला लाखो रुपयांचे वीजबिल सरकारकडून भरले जात आहे. हे इस्पितळ म्हणजे जनतेच्या पैशांचा अपमान आहे. इस्पितळाच्या नावाने भव्य इमारत उभारून पेडणेतील सर्वसामान्य जनतेला मात्र म्हापसा आणि बांबोळी येथे उपचारासाठी जावे लागत आहे. हे इस्पितळ तातडीने गोवा मेडिकल कॉलेजच्या ताब्यात देऊन कार्यरत करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
वरूनच काय ते करून घ्या
“या इस्पितळाबाबत आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही. तूर्त सामाजिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्याचा सरकारचा विचार आहे,” असे डॉ. रूपा नाईक म्हणाल्या. उर्वरित निर्णय हा सरकारचा धोरणात्मक भाग आहे आणि त्याचा पाठपुरावा सरकारकडे करावा, असा सल्ला त्यांनी शिष्टमंडळाला दिला. विशेष म्हणजे या इस्पितळाचे काम गोवा पायाभूत विकास महामंडळाकडून सुरू असल्यामुळे आरोग्य खाते या इमारतीच्या एकूणच रचनेबाबत आणि उभारलेल्या सुविधांबाबत अनभिज्ञ असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाच्या सदस्यांनी दिली. शिष्टमंडळाचे नेतृत्व जुझे लोबो यांनी केले, तर देवेंद्र प्रभूदेसाई, व्यंकटेश नाईक आणि तुळशीदास राऊत हे उपस्थित होते.
सरकारपुढे आमदार हतबल
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर हे तुये इस्पितळाच्या विषयाला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. तुये इस्पितळ मांद्रे मतदारसंघात येते. आमदार जीत आरोलकर हे मगोचे आमदार असले तरी त्यांचा सरकारला पाठींबा आहे. इस्पितळाच्या विषयावर सरकार जे निर्णय घेते ते मान्य करण्याची हतबलता त्यांच्या भूमिकेतून स्पष्टपणे जाणवते, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाच्या सदस्यांनी दिली.






