व्यावहारिक भागवत धर्म

बाबा म्हणाले, “ज्ञानोबांची भक्तीयोगाची व्याख्या लक्षात घे म्हणजे संभ्रम होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तीयोग निश्चित। जाण माझा। नामदेवांना विसोबा खेचरांनी दीक्षा दिल्यानंतर केवळ विठ्ठलाच्या मूर्तीत दिसणारा विठ्ठल त्यांना त्यांची भाकरी पळवणाऱ्या कुत्र्यातदेखील दिसू लागला. म्हणूनच मग ते ‘विठ्ठला सुकी भाकर खाऊ नको, तूप घे’ म्हणत त्या कुत्र्याचे मागे गेले. सर्वत्र ब्रम्हतत्व भरलेलं आहे जाणलेल्या ज्ञानोबांना रेड्याच्या पाठीवर मारलेल्या आसूडाच्या वेदना स्वतःच्या पाठीवर जाणवू लागल्या. खरं म्हणजे अचर सृष्टीपेक्षा जीवमात्रात चैतन्याचे अस्तित्व ठळकपणे अनुभवास येत असते. प्रत्येकातला जीवंतपणा हा विठ्ठल आहे.”
त्यावर मी म्हणालो, “म्हणुनच संत सावता माळी ‘कांदा मुळा भाजी अवघी, विठाबाई माझी’ म्हणायचे ना. ते पंढरपूराजवळच्या अरणगावात राहून देखील वारीला कधी गेले नाहीत.”
“संत सावतोबांचा उदाहरण घेताना सावध रहा बरे का! संत सावता माळ्यांचे उदाहरण घेत प्रत्येक धंदेवाईक स्वतःला धार्मिक म्हणू लागेल तर ती आत्मवंचना होईल. प्रत्येक धंदेवाईक त्याच्या धंद्यात गुंतलेला असतो. रात्रंदिवस त्याचे मन धंद्याचाच विचार करत असते. आपल्या शेताचा दिवसरात्र विचार करणारा प्रत्येक माळी हा संत होत नाही. अलिकडे ‘कर्मयोगी’ हा शब्द अनाठायी वापरला जातो. सतत कामात गुंतलेला प्रत्येक माणूस ‘कामसू’ असू शकतो, कर्मयोगी नसतो. संत सावता माळी पुजा म्हणून मळा फुलवत होते. शेतातली प्रत्येक गोष्ट करताना त्यांना विठ्ठलाचे स्मरण होत होते. त्यांच्या मनात नफ्याचे नव्हे, नारायणाचे चिंतन होत होते हे लक्षात घे. पंढरपूरच्या बाजारात एकादशीला तुळशी खूप खपतील, फुले-फळे खूप खपतील म्हणून ते लागवड करत नव्हते. उलट वारीला जाणाऱ्या माणसांना आपल्या मळ्यातील फळे-मुळे वाटण्यात त्यांना पांडुरंगाची सेवा वाटत होती.
विचार कर, समजा संत सावतोबांना कोणी असे सांगितले असते की शेतीपेक्षा जास्त मिळकत राजाच्या दरबारात नोकरी धरण्यात आहे, तर त्यांनी शेतीसोडून दरबारात नोकरी पत्करली असती का? शेती किफायतशीर करण्यासाठी त्यांना एखाद्या शहाण्या माणसाने द्राक्षे लावून त्यापासून दारु काढण्याचा सल्ला दिला असता तर त्यांनी काय केले असते? विठ्ठला, पापाची पाठराखण करणारी अशी माणसे का रे माझ्या वाटेला पाठवतोस, म्हणून ते अस्वस्थ झाले नसते का?” बाबा म्हणाले.
सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे, हे अध्यात्मिक सत्य पक्के ठाऊक असणे, हेच सर्व वारकरी संत करुणेने का भरलेले होते याचे कारण आहे. एकनाथ महाराज एकदा काशीहून रामेश्वरला गंगोदकाची कावड घेऊन चालले होते. काशीतील गंगेच्या पाण्याचा रामेश्वरावर अभिषेक करणे हे त्याकाळातले एक व्रत होते. त्यासाठी आधी काशीला जायचे, तिथे गंगेच्या पाण्याने कावड भरायची. आणि ती कावड स्वतःच्या खांद्यावर वाहून शेकडो मैल दूर असलेल्या दक्षिणेतील रामेश्वरला जायचे. धड रस्ते नाहीत. वाटेत नद्यानाले, डोंगरदऱ्या, खाचखळगे. ते पायी पार करायचे आणि काशीपासून शेकडो मैल असलेल्या रामेश्वरला पोचायचे आणि एवढ्या कष्टाने नेलेल्या पाण्याने रामेश्वरावर अभिषेक करायचा. एकनाथ महाराज ही यात्रा करण्यासाठी काशीहून निघाले. अर्धे अंतर त्यांनी पार केले होते. अशात ओसाड प्रदेश लागला. ऊन रणरणत होते. अशा ऊन्हात एके ठिकाणी त्यांना एक गाढव तहानेने व्याकूळ झालेले दिसले. मागचा पुढचा विचार न करता नाथांनी इतक्या कष्टाने आणलेले गंगेचे पाणी त्या गाढवाला पाजायला सुरवात केली. नाथांचे हे कृत्य पाहून नाथांच्या मुलाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. नाथ म्हणाले, ‘या गर्दभाच्या रुपात तहानेने व्याकूळ झालेला रामेश्वरच आपल्याला सामोरा आलेला आहे. त्याला तसेच तहानलेले सोडून पुढे कसे जाता येईल!’
नाथ प्राणिमात्रांच्या बाबतीतच केवळ असे वागले असे नाही. सर्वत्र देव भरलेल्या देवाची पुजा करण्यासाठी त्यांनी कठोर सामाजिक परंपरा देखील मोडल्या, अगदी वाळीत टाकण्याचा व जीवाचे बरेवाईट केले जाण्याचा धोका पत्करून मोडल्या. एकदा एक अस्पृश्याचे मूल गोदावरीच्या वाळवंटात भर दुपारी रडताना आढळले तर नाथांनी त्याला उचलून घेत, त्याला शांत केले. त्याची आई शोधून तिच्या हवाली केले. एकदा पुरोहितांनी त्यांच्याकडे श्राद्धासाठी येण्यास बहिष्कार घातला तर त्यांनी पहिली पंगत अस्पृश्याना वाढली. एवढेच नव्हे तर चारशे वर्षांपूर्वी अस्पृश्याच्या घरी जाऊन जेवण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. ही गोष्ट सांगताना बाबा म्हणाले, “धार्मिक माणसाने माणुसकीला काळिमा फासणार्या रुढी-परंपरा जीवाचा धोका पत्करून देखील अव्हेरल्या पाहिजेत. संत आपल्या जीवनातून घालून देत असलेला हा आदर्श तुझ्यामाझ्यासारख्या सामान्यांसाठीच असतो. तेव्हा हे केवळ सिद्धपुरुषांनाच किंवा संतानाच शक्य आहे अशी पळवाट कधीही काढू नकोस.”
मी जेव्हा डाॅक्टर झालो तेव्हा बाबा म्हणाले, “तू जर सरकारी नोकरी पत्करलीस तर दामाजीपंतांचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेव!”
‘झाला महार पंढरीनाथ’ हा दामाजी पंतांवरचा सिनेमा मी लहान असताना पाहिला होता. दामाजी हे मंगळवेढ्याचे सुभेदार. बिदरच्या बादशहाचे सरकारी नोकर. सारा गोळा करणे त्यांचे काम. एकदा दुष्काळ पडला. लोक उपासमारीने मरु लागले. सुभेदार म्हणून कोणी दामाजींकडे मदत मागायला येत. दामाजी आपल्याजवळचे धान्य देत. पण हळूहळू मागणाऱ्यांची संख्या वाढली. आता दामजींकडचे धान्य सर्वांना पुरणे शक्य नव्हते. दामाजींना लोकांचे हाल सहन होईनात. त्यांच्या अखत्यारीत सारा गोळा केलेले धान्याचे कोठार होते. गरीब शेतकरी त्या काळात सारा म्हणून धान्यच देत. ते गोळा करुन नंतर बादशहाकडे पोचवणे हे दामाजीपंतांचे काम. त्यामुळे धान्याने भरलेले कोठार जरी त्यांच्या ताब्यात असले तरी ते त्यांचे नव्हते. ते बादशहाचे होते. ते गोरगरीबांना वाटून टाकण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्यांनी तसे केले तर बादशाहा कठोर शिक्षा करणार हे ठरलेले होते. अशा वेळेस दामाजींच्या धार्मिक मनाने निर्णय दिला. उपाशी जनताजनार्दनासाठी कोठार खुले कर आणि त्यासाठी मृत्युदंड स्वीकारण्याची तयारी ठेव. दामाजीपंतानी कोठार उपाशी जनतेसाठी मोकळे केले. मृत्युदंड होणार हे माहीत असून मोकळे केले. बादशाहपर्यंत ही बातमी गेली. बादशहाने दामाजीपंताना धरून आणण्यासाठी शिपाई पाठवले. ते त्यांना घेऊन बिदराला पोचण्याआधी विठ्ठल धावून गेला. विठू महार बनून विठ्ठल बादशहाच्या दरबारात पोचला. त्याने दामाजींनी खुले केलेल्या कोठारातील धान्याची किंमत बादशहाला अदा केली.
मी बाबांना विचारले, “ते दामाजीपंत होते. संत होते. त्यांच्यासाठी विठ्ठल धावला. माझ्यासाठी येईल का?”
“विठ्ठल येईल की नाही हा प्रश्न तुझ्या मनात येताच कामा नये. दामाजीपंतांच्या मनात असा प्रश्न आला नव्हता. धार्मिक व्हायचं असेल तर असंच वागायला हवं. उलट तुझ्या मनात असं आलं पाहिजे की माझ्यासाठी विठ्ठलाला त्रास होऊ नये. तुलसीदासांसारखी दृष्टी व्हायला हवी तुझी,” बाबा म्हणाले.
रामचरीतमानस हा ग्रंथ ज्यांनी लिहीला ते गोस्वामी तुलसीदास. एकदा त्यांच्या घरी चोरांनी चोरी करायचे ठरवले. पण रात्री जेव्हा ते चोर त्यांच्या झोपडीकडे पोचले तेव्हा त्यांना दिसले की दोन तरुण हातात धनुष्यबाण घेऊन खडा पहारा देत आहेत. चोरांनी अनेकदा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळी ते दोघे पहारेकरी त्यांना तुलसीदासांच्या घराभोवती दिसले. त्या चोरांनी ते तरुण कोण अशी चौकशी केली. पण कोणालाच त्यांची माहिती नव्हती. दिवसा कोणीच तुलसीदासांच्या झोपडीकडे कोणा तरुणांना पाहिले नव्हते. त्या तरुणांच्या गुढामुळे ते चोर घाबरले आणि सरळ जाऊन त्यांनी तुलसीदासांकडे आपली कबुली देऊन माफी मागितली. ही गोष्ट ऐकून तुलसीदासांच्या डोळ्यात पाणी आले. गंमत म्हणजे ते त्या चोरांना काहीच बोलले नाहीत. त्यांना त्यांच्याविषयी काहीच वाटले नाही. ते रामलक्ष्मणाच्या मूर्तींकडे उभे रहात म्हणाले, ‘प्रभू, माझ्यामुळे तुम्हाला असा त्रास व्हावा ना. मी जर माझ्या झोपडीत धन साठवले नसते तर या चोरांना ते चोरण्याची इच्छा झाली नसती. आणि माझ्या झोपडीचे रक्षण करायला यायचा त्रास तुम्हाला झाला नसता. ज्या धनामुळे तुम्हाला त्रास घडला ते धनच मी वाटून टाकतो.’ तुलसीदासांनी जे काही चोराना आकर्षित करणारे होते, ते त्या चोरानाच देऊ केले. पण तुलसीदासांच्या अशा वागण्याने चोरच बदलून गेले होते. त्यांनी ते घेण्यास नकार दिला. तुलसीदासांनी ते गरीबांना वाटून टाकले. त्यानंतरच त्यांच्या मनाला शांती लाभली. “तुलसीदासांसारखं आपलं मन व्हावं यासाठी प्रयत्न करायला हवा,” बाबा म्हणाले.
नेहमीच्या जीवनात आपल्याकडे येणारा पैसा कसा येतो याबाबत धार्मिक माणसाने सावध असले पाहीजे, असे बाबा नेहमी बजावत. डाॅक्टर, नर्स वगैरेंचा पैसा हा रक्त-पूचा पैसा असतो. तो दुसर्‍यांच्या दुखावर मिळवला जातो, तेव्हा धार्मिक जीवन जगू पाहणार्‍या डाॅक्टरने रोग्याला रुग्णनारायण समजून त्याची मोफत सेवा करावी, असे रामकृष्ण परमहंसांनी सांगितल्याचे बाबा एकदा म्हणाले. मला हे समजायला कठीण नाही गेले. कारण बाबांनी तुकाराम महाराजांची एक गोष्ट मला सांगितली होती. मी ती गोष्ट गो. नि. दांडेकर यांच्या संत तुकाराम चरित्रात वाचली होती. पण त्याचं मर्म मला बाबांनी सांगितलं होतं. तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या भामनाथाच्या डोंगरावर पंधरा दिवस तपश्चर्येत घालवल्यानंतर ते जेव्हा परत आले, तेव्हा त्यांनी आपल्या भावाला तिजोरीतील कर्जखते आणायला सांगितली. तुकाराम महाराजांच्या घरात सावकारीचा व्यवसाय चालत आला होता. ते गरजुना पैसे कर्जाऊ देत आणि त्या बदल्यात कागद लिहून घेत. त्या लिहून घेतलेल्या कागदाला कर्जखत म्हणत. पैसे कर्जाऊ घेतलेल्या माणसांना व्याजासह मूळ रक्कम परत करावी लागे. तुकोबांच्या भावाने घरातली कर्जखते आणली. तुकोबा म्हणाले, ‘ही आपण इंद्रायणीत बुडवू. अडलेल्या माणसाला लुबाडण्याचा हा धंदा आहे. आपण पैसे कर्जाऊ देतो आणि व्याजाच्या रुपाने फायदा घेतो. हेच पैसे नुसते तिजोरीत ठेवले तर आपोआप व्याज तयार होते का? नाही ना. व्याज घेणे हा अधर्म आहे. अधर्माचे मूळ असलेली कर्जखते बुडवू.’ तुकोबांचा भाऊ कर्जखते बुडवण्यासाठी तयार झाला नाही. मग तुकोबांनी कर्जखतांचे दोन वाटे केले. एक वाटा भावाला घ्यायला सांगितला. भावाने आपला वाटा घेताच उरलेला वाटा तुकोबांनी इंद्रायणीत बुडवला. सम्यक आजीविकेचा मंत्र त्यांनी आपल्या जीवनात आणला. धार्मिक माणसाने आजीविकेच्या बाबतीत किती सावध असावे हे तुकोबांनी दाखवले आहे. एवढेच नव्हे तर कोणी काही भेट म्हणून हौसेने दिले तर धार्मिक माणसाने त्याचा स्वीकार करावा का, याचाही वस्तूपाठ तुकोबांच्या जीवनात दिसतो. छत्रपति शिवाजी महाराजांनी तुकोबांना नजराणा पाठवला. रयतेच्या राजाने पाठवलेला (कोणा लुटारू सुलतानाने पाठवलेला नव्हे) नजराणा घ्यायला सामान्यपणे कोणी नकार देणार नाही. पण तुकोबांनी नकार दिला. महाराजांविषयी अपार आदर असताना देखील नकार दिला. हे धार्मिक वर्तन आहे. म्हणून अनुकरणीय आहे.
मुळात धार्मिक माणसाने उदरनिर्वाहासाठी कोणते साधन निवडावे? व्याधगीता काय सांगते? कसाई असला तरी तो ‘आपले गिर्‍हाईक देव आहे’ असे समजून त्याला चांगले मांस देत असेल तर तो धर्म ठरतो. पण भागवत धर्म त्याच्या पुढे जातो. संत शेख महंमद हे भागवत धर्मातील एकनाथांचे समकालीन संत. त्यांना त्यांच्या चांद बोधले या गुरुंनी ज्ञानेश्वरीची दीक्षा दिली होती. शेख महंमदांच्या घरात मुलाण्याचे काम परंपरेने चालत आले होते. पंधरा वर्षांच्या शेख महंमदांना जेव्हा पहिल्यांदा बकरा कापण्यासाठी पाठवण्यात आले तेव्हा त्यांनी सूरा आपल्या करंगळीवरुन फिरवला. प्रचंड वेदना झाल्या. आपल्याला इतक्या वेदना होतात तर ज्याच्या मानेवरून हा सूरा फिरवला जाईल त्या बकर्याला किती वेदना होतील या विचाराने त्यांनी मुलाण्याचे काम कायमचे सोडून दिले. धार्मिक माणूस असे कोणतेही काम उदरनिर्वाहासाठी निवडू शकत नाही ज्यात दुसर्‍या जीवाला वेदना द्याव्या लागतात.
“पण बाबा आजच्या जगात जगायचे म्हणजे पैसा लागतोच ना?” मी विचारले.
“पैसा नाही लागत. जगण्यासाठी जिन्नस लागतात. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज आज जशी होती तशी कालही होती. आज ती मिळवण्याचे माध्यम पैसा आहे एवढेच. मुळात आपली गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे, पैसा नव्हे, हे पक्के लक्षात ठेव. पैशाचे वैशिष्ट्य असे की तो तुमचा लोभ वाढवतो. माझ्याकडे दहा कोठारे भरून तांदूळ असावा अशी वासना होण्याची शक्यता कमी, पण दहा कोटी रुपये असावेत अशी वासना होण्याची शक्यता जास्त. कोणीही उपाशी राहू नये, माणसाच्या किमान गरजा भागाव्यात. पण किमान गरजांचा निकष काय असावा? तू ज्ञानोबांचा भक्त असशील तर ज्ञानोबांच्या लौकिक वाट्याला जे अन्न, वस्त्र, निवारा आला, त्यापेक्षा अधिक आशा बाळगणं योग्य होईल का? ज्ञानोबा, तुकोबा, जनी, मुक्ता, नामदेव यांच्या किमान गरजाच भागल्या असतील ना? तितक्यात भागाव्यात. ज्याचा देवावर विश्वास असेल त्याने भगवंताचे पक्के आश्वासन मानून असावे की धार्मिक माणसाचा योगक्षेम भगवंत पाहतो. गीतेत तसे वचनच दिलेय त्याने. योगक्षेम पाहतो, पण बंगला-गाडी- पर्यटन वगैरे चंगळ नाही बरे का! संत तुकडोजी महाराज आजच्या काळातले. ते ‘या झोपडीत माझ्या’ कवितेत धार्मिक माणसाने साधेपणाने कसे मौजेने रहावे त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात,
राजास जी महाली सौख्ये कधी न मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या।
तेव्हा शक्यतो तुझ्या अन्नवस्त्राची सोय होईल इतकेच मिळव. उरलेला वेळ दरिद्रीनारायणाला दे. जास्त मिळकत आलीच तर देव तुला लालूच दाखवून दूर लोटू पाहतोय हे लक्षात ठेव आणि त्याच्या रंजल्यागांजल्या रुपाला जास्तची मिळकत परत कर. आणि हे करताना मनाला पक्के बजाव की हे तू काही मोठ्ठे उपकार करत नाहीस. धन्याचा माल त्याच्या मुलांकडे पोचवण्याचे काम करतोस, जसा पोस्टमन मनीऑर्डर पोचती करतो.
परमेश्वराचे एक नाव सर्वेश्वर आहे. या सर्वेश्वराच्या पुजनाचे मर्म सांगताना तुकोबा सांगतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे। त्याआधी ते सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। भेदाभेदाला फाटा म्हणजे उच्चनीचतेला फाटा, श्रेष्ठ कनिष्ठतेला फाटा, जाती व्यवस्थेला फाटा. धार्मिक जीवनासाठी भेदाला फाटा देणे अपरिहार्य असते. ‘अद्वैत दर्शन’ हे भारतीय दर्शनातील परमोच्च दर्शन. त्याचे कडवे समर्थक आदीशंकराचार्य. या आदीशंकराचार्यांच्या जीवनातील एक कथा आहे. ते एकदा मध्यान्ह समयी गंगेवर स्नानासाठी जात होते तेव्हा त्यांच्या समोरुन अस्पृश्य जातीचा माणूस आला. त्याचा आपल्याला स्पर्श होईल या भीतीने शंकराचार्य त्याला म्हणाले, ‘बाजूला हो.’ त्यावर त्या अस्पृश्यांने त्यांना प्रश्न केला की ‘कोणी कोणापासून बाजूला व्हावे? तुझ्यात जे चैतन्य आहे तेच माझ्यात आहे. मुंगीपासून ब्रम्हदेवापर्यंत सर्वांच्यात एकच चैतन्य विराजमान असताना हा ब्राम्हण आणि तो अस्पृश्य हा भेद तुमच्या मनात येतोच कसा?’ त्याच्या त्या प्रश्नाने भेदाभेद मानण्याचे पाप आपण करतोय याची शंकराचार्यांना जाणीव झाली आणि त्यांनी त्या अस्पृश्याचे पाय धरले.
‘वैष्णव’ या शब्दाची साधीसरळ व्याख्या आहे, विष्णूचा भक्त तो वैष्णव! पण ही शाब्दिक व्याख्या झाली. शब्दाच्या व्युत्पत्तीची व्याख्या झाली. पण वैष्णव शब्दाची व्यावहारिक व्याख्या काय? संत नरसी मेहतांना विष्णूची पूजा करणारा तो वैष्णव ही व्याख्या अपुरी वाटते. ते म्हणतात, वैष्णव जन तो तेणे कहिए जे पिड परायी जाणे रे दुसर्‍याची वेदना जाणतो तो वैष्णव!
“पण बाबा संतांना जशा भावना नियंत्रणात ठेवता येत होत्या, तशा आपल्याला कशा ठेवता येतील?” मी विचारले.
“संत ही माणसाचे होती. त्यांचा देहदेखील तुझ्यामाझ्यासारखा अन्नमयच होता. त्यांनादेखील तुझ्यामाझ्यासारखे मन होते. आणि त्यांच्यात आत्मरुपाने जसे चैतन्य नांदत होते, तसेच आपल्यातही नांदत आहे. त्यांच्यात व आपल्यात हाच फरक आहे की आपण आपल्या मनावर काम करत नसतो, पण संत स्वतःच्या मनावर काम करत असतात. लहान असताना ज्ञानोबांना देखील लोक करत असलेला छळ असहय्य झाला होता. त्यांनी उद्विग्न होऊन झोपडीत स्वतःला कोंडून घेतले होते. त्यावेळेस मुक्ताईने त्यांची समजूत काढली होती. मुक्ताईने ज्ञानोबांची काढलेली समजून ‘ताटीचे अभंग’ नावाने शब्दबद्ध आहे. ‘ताटीचे अभंग’ हे धार्मिक माणसाच्या मनाची समजूत कशी घालावी याचा वस्तुपाठ आहे. तुम्हाला छळणारा माणूस तुमच्याहून परका नाही. तुमच्या जिभेला दाताने चावले तर तुम्हाला तुमच्या दातांचा राग येतो का? तुम्ही तुमचे दात पाडायला प्रवृत्त होता का? अद्वैत पहाणार्‍याची नजर आपल्या समस्यांच्या बाबतीत अशी बनली पाहीजे,” बाबा म्हणाले.
तुमचं जीवन धार्मिक जीवन व्हावं असं वाटत असेल, तुमच्या मनात राग द्वेष येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर एकनाथांची गोष्ट उपयोगाची होईल. एकदा पैठणमधल्या एकाने एकनाथांना प्रश्न केला की, ‘नाथ, तुम्ही नेहमीच चांगले कसे वागता?’ नाथ त्याला म्हणाले, ‘मी कसा वागतो हे बाजूला ठेव. मला तुझं भविष्य काही चांगलं दिसत नाही. आठ दिवसांनी तुझ्या नशीबात मृत्यूयोग आहे.’ एवढे बोलून नाथ निघून गेले. त्यानंतर आठ दिवसांनी नाथ त्या माणसाच्या घरी पुन्हा गेले आणि म्हणाले, ‘गेल्या आठ दिवसात तू कोणाशी वाईट वागलास का? कोणावर चिडलास का? कोणाला त्रास दिलास का?’ तो माणूस म्हणाला, ‘नाथ, मृत्यू समोर दिसत असताना दुसऱ्याशी वाईट वागणे कसे शक्य होईल. उलट कोणी माझ्यापासून दुखावला जाऊ नये म्हणून मी कटाक्षाने प्रयत्न करत होतो.’ नाथ म्हणाले, ‘हेच माझ्या सज्जनपणे वागण्याचे कारण आहे. मी मृत्यूचा विसर पडू देत नाही. सतत मृत्यूची आठवण ठेवल्यामुळे माझे मन काहीही वाईट करायला धजावत नाही.’
“पण बाबा, असे जगणे आजच्या जीवनात कठीण आहे,” मी म्हणालो.
“धार्मिक जीवन जगणे आजच नव्हे, अगदी पुरातन काळापासून कठीण होते. कठीण आहे म्हणून ते जर तुझ्या व्यवहारातून वजा करण्याचा विचार करत असशील तर धर्माची गोष्ट तू न केलेली बरी. पण तुला जर असे जीवन जगताना चुकण्याची भीती असेल तर त्याची काळजी करु नको. कारण देव तुझा भाव बघतो, तुझे बाह्य उपचार नाही. एकनाथांनी हे निःसंदिग्ध शब्दात सांगितले आहे.
नाथ म्हणतात, भाव तोचि देव, भाव तोचि देव, ये अर्थी संदेह धरु नका। शबरीची उष्टी बोरं खाणारा राम, सुदाम्याचे सुके पोहे खाणारा कृष्ण याचीच साक्ष देतो. यापेक्षा आणखी काय आश्वासकता हवी तुला त्याच्या प्रेमाला? कृष्ण जेव्हा शिष्टाई करायला हस्तीनापूरात गेला तेव्हा त्याच्या रहाण्याची सोय अर्थातच राजवाड्यात करण्यात आली होती. पण तो राहीला कुठे? दासीपुत्र विदुराच्या झोपडीत. भावनेनेच भगवंताला आपलेसे करता येते, ऐश्वर्याने नाही. आणि लौकिक अर्थाने तुझ्याकडे काहीही नसले तरी हरकत नाही. भागवत धर्म तुला अत्यंत कठीण काळात देखील जगता येतो! तरीही एका गोष्टीत नेहमी सावध रहा. खरा धर्म जगणं आणि धर्माचा अभिनय करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डोक्याला टीळा चंदन लावून, सोवळे नेसून, संस्कृत भाषेतील श्लोक म्हणून तू लोकांना प्रभावित करुन तुझा अहंकार वाढवू शकतोस. लोकांच्या नजरेत धार्मिक ठरु शकतोस. पण देवाच्या नजरेत धार्मिक होऊ शकत नाहीस. तेव्हा सतत तुझ्या विचारांना व कृतींना तपासत रहा. आणि या तपासासाठी तुकाबांनी अगदी निःसंदिग्ध निकष दिला आहे.
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा।
मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त।
ज्यासि अपंगिता नाही, त्यासि धरी जो हृदयी।
दया करणे जे पुत्रासि, तेचि दासा आणि दासी।
तुका म्हणे सांगू किती, तेचि भगवंताच्या मूर्ती।
तुकोबांचा हा अभंग मनात नेहमी घोळवत रहा,” बाबा म्हणाले.
…….
डाॅ.रुपेश पाटकर
उत्तरार्ध

  • Related Posts

    सावधान !

    मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

    चंगळवादाचे मानसशास्त्र

    (जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! ) ‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2025
    • 4 views
    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2025
    • 4 views
    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2025
    • 5 views

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2025
    • 5 views
    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2025
    • 5 views
    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2025
    • 7 views
    error: Content is protected !!