न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?

राजकीय आरक्षण हे कोणत्याही पक्षाच्या विजयाचे नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या लढ्याचे फलित आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्याची प्रामाणिक अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे.

गोव्यात अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ६ ऑगस्ट २०२६ पासून संबंधित कायदा लागू झाल्याने आता मतदारसंघ फेररचना आयोगाची स्थापना, लोकसंख्येचा अभ्यास, आरक्षित मतदारसंघांची शिफारस, हरकती आणि सुनावण्या अशी प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे स्पष्ट केले असले तरी विधानसभा निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक असताना सुरू झालेली ही हालचाल अनेक प्रश्न उपस्थित करते.

एसटी समाजाला राजकीय आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजूर होऊन जवळपास वर्ष उलटत आले आहे. मग इतका विलंब का झाला? जर सरकारची इच्छाशक्ती ठाम होती, तर ही प्रक्रिया वर्षभरापूर्वीच पूर्ण होऊ शकली असती. आता निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने प्रक्रिया सुरू करण्यामागे विरोधकांना तयारीची संधी न देणे, संभाव्य न्यायालयीन आव्हाने उशिरा निर्माण होऊ देणे किंवा आरक्षित मतदारसंघांबाबत राजकीय आघाडी मिळवणे, असे हेतू असू शकतात. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ सामाजिक न्यायाच्या दृष्टीने नव्हे, तर राजकीय रणनीतीच्या नजरेतूनही पाहिले जात आहे.

एसटी आरक्षणाचे श्रेय भाजप घेणार, यात काही गैर नाही. २००३ मध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यात भाजपची भूमिका होती. परंतु त्यानंतर सामाजिक आणि राजकीय न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अपेक्षित तत्परता दाखवली नाही, हेही वास्तव आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे आरक्षण लागू होऊ शकले असते. तसे झाले नाही. त्यामुळे उटाच्या आंदोलनात दोन तरुणांना हौतात्म्य पत्करावे लागले, ही गोष्ट आजही समाज विसरलेला नाही.

या आरक्षणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील. सध्या आरक्षण नसतानाही चार आदिवासी आमदार विधानसभेत आहेत आणि चौघेही भाजपसोबत आहेत. मात्र फेररचनेनंतर त्यांच्या मतदारसंघांचे स्वरूप बदलू शकते. काणकोणचे आमदार रमेश तवडकर किंवा सावर्डेचे डॉ. गणेश गावंकर यांच्यासारख्या नेत्यांसमोर नवीन राजकीय आव्हाने उभी राहू शकतात. चार आरक्षित मतदारसंघांपलीकडेही आदिवासी समाजाला उमेदवारी देण्याची राजकीय उदारता सत्ताधारी पक्ष दाखवणार का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

राजकीय आरक्षण हे कोणत्याही पक्षाच्या विजयाचे नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या लढ्याचे फलित आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्याची प्रामाणिक अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आरक्षणाच्या नव्या राजकारणात आदिवासी समाजात फूट पडू नये. हा अधिकार संघर्षातून मिळाला आहे; तो समाजाच्या एकजुटीला बळ देणारा ठरावा, हीच आजची खरी अपेक्षा आहे.

  • Related Posts

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    या उड्डाणपुलाचा खरा कस उद्घाटनाच्या दिवशी नव्हे, तर पुढील अनेक वर्षे तो हजारो वाहनांना किती सुरक्षितपणे मार्ग देतो यावर लागणार आहे. पर्वरीतील बहुचर्चित उड्डाणपुलाचे उद्घाटन आज, ९ सप्टेंबर रोजी मोठ्या…

    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    त्यामुळे कार्यालयाचे उद्घाटन हेच प्रसिद्धीचे मुख्य केंद्र बनू नये, म्हणून अमित शहा मध्येच उठून गेले तर नसतील, असा प्रश्नही उपस्थित होतो. भाजप कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अचानक…

    You Missed

    Do Not Test the Patience of Goans!

    Do Not Test the Patience of Goans!

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    09/09/2026 e-paper

    09/09/2026 e-paper

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?