
पणजी पोलिस स्थानकांत तक्रार नोंद
पणजी,दि.१ (प्रतिनिधी)
वीज खात्याचे कार्यकारी अभियंते आणि आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी अखेर आज पणजी पोलिस स्थानकांत कालच्या मुरगांव तालुक्यातील बोगदा वीज कार्यालयाकडील घटनेसंबंधीची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या तक्रारीत मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांचा प्रमुख संशयीतांत उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले, परंतु संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा ‘संकल्प
‘ मात्र त्यांनी उघड केला आहे.
वीज खात्याच्या भूसंपादन विभागाचे नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंते या नात्याने त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ओंकार दुर्भाटकर, यश फडते, सुधीर तारी, योगेश पाटील आणि इतरांविरोधात हे आरोप ठेवले आहेत. बोगदा येथील वीज खात्याच्या मालमत्तेत बेकायदा अतिक्रमण करून तेथील सरकारी अधिकाऱ्यांना आपली सेवा बजावण्यात अडथळा निर्माण करणे तसेच त्यांचा अपमान तथा त्यांना प्रतिकार करण्यास उत्तेजीत करण्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याठिकाणी दंगेखोरी करून सरकारी अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा किंवा त्यांच्या जिविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असेही त्यांनी म्हटले आहे.
संकल्प आमोणकरांचा उल्लेख टाळला
मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांचे नाव मात्र मूळ तक्रारीत नोंदवण्याचे काशिनाथ शेटये यांनी टाळले. संकल्प आमोणकर यांनी आपल्याला धमकी दिल्याचा नकार देत त्यांनी हे गुंड आपल्याला ठार मारतील, असे म्हटले होते, असा युक्तिवाद केला आहे. हे गुंड त्याठिकाणी पूर्वीच हजर होते पण आमदार एकटे तिथे दाखल झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. वीज खात्याच्या कार्यालयाचे कुंपण मोडून तिथे चार ठिकाणी वाटा तयार केल्या आहेत. यापैकी कुठली तरी एक वाट सोडून अन्य वाटा बंद करण्यासाठी वीज खात्याचे अधिकारी गेले होते. तिथे या लोकांनी अटकाव करून त्यांना अडवण्याचा आणि धमकावण्याचा प्रकार घडला, असेही काशिनाथ शेटये यांनी म्हटले आहे. या तक्रारीबाबत आपण वरिष्ठांची परवानगी घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गुंडांना घाबरत नाही…
आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना असल्या धमक्यांची आपल्याला सवय आहे, असे सांगून आपल्याकडे परवानाधारक शस्त्रे आहेत आणि आपण त्याद्वारे आपले संरक्षण करू शकतो, असा खुलासा काशिनाथ शेटये यांनी दिला. सरकारी अधिकाऱ्यांकडे अशी वागणूक कशी काय सहन केली जाऊ शकते. या गुंडगिरीला आळा घातला नाही तर कुठला अधिकारी आपली सेवा बजावण्यास धजेल, असेही ते म्हणाले. पोलिसांनी फोन करून बोलावल्यानंतर तिथे पोलिस ह्याच लोकांसोबत उभे होते पण कारवाई मात्र केली नाही, असा टोलाही शेटये यांनी हाणला. पोलिस गुन्हा नोंद करून घेण्यास चालढकल करत असतील तर आपण न्यायालयात जाऊन हा गुन्हा नोंद करून घेण्यास समर्थ आहे, असा इशाराही काशिनाथ शेटये यांनी दिला.