‘सिंहा’ च्या शिकारीसाठी गावडेंकडे बंदूक

मगोचा खात्मा करण्याची भाजपची व्युहरचना

गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी)

गोवा मुक्तीनंतर पहिल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत विधानसभेत आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या एकमेव मगो पक्षाची गेम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ढवळीकर बंधूंचे पारंपारिक प्रतिस्पर्धी तथा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी थेट ढवळीकरांनाच लक्ष्य बनवल्याने मगोच्या सिंहाची शिकार करण्यासाठी भाजपने गोविंद गावडे यांच्याकडे बंदूक सुपुर्द केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपची निवडणूक तयारी सुरू
भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पार पाडल्यानंतर आता मतदारसंघ मंडळ समिती जाहीर करण्याचे सत्र सुरू आहे. मगो पक्षाचे दोन आमदार विधानसभेत आहेत. मांद्रेचे जीत आरोलकर आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर सरकारात आहेत. भाजपने मंडळ समिती जाहीर करण्याच्या निमित्ताने मांद्रेनंतर आता प्रियोळ मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असे जाहीर करून अप्रत्यक्ष मगो पक्षाला डिवचले आहे. प्रियोळात तर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी युती हवी असेल तर आत्ताच बोला अन्यथा सरकार सोडून गेलात तरी चालेल, असे म्हणून उघडपणे मगोला आव्हान दिले आहे. गत विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरून भाजपने २० जागा जिंकल्या होत्या. आता स्वबळावर २७ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने सोडला असून त्यात मगो पक्षाची कोंडी करण्याचा डाव पक्षाने सुरू केला आहे.
ढवळीकर एकाकी
गत विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाने तृणमूल काँग्रेससोबत युती केली. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात अजिबात सहभागी होणार नाही, अशी गर्जनाही केली. निवडणुकीनंतर मात्र भाजपचे २० आमदार निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात सुदिन ढवळीकर हेच आघाडीवर होते. दरवेळेला सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावून आपले मंत्रीपद राखून ठेवणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना एकाकी पाडण्याची रणनिती भाजपने आखली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अगदी जवळील आमदार म्हणून ओळखले जातात. प्रसंगी त्यांना भाजपात आणून उमेदवारी देण्याची तयारीही भाजपने केल्याची खबर आहे. सुदिन ढवळीकर यांनी मगो पक्षाचे भाजपात विलीनीकरण केल्यास त्यांना काही जागा दिल्या जाण्याची अट घातली जाणार असल्याचीही माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे.
गोविंद गावडेंकडे दिली बंदूक
प्रियोळ मतदारसंघात मगोचे दीपक ढवळीकर यांचा पराभव केलेले गोविंद गावडे हे ढवळीकर बंधूंचे पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात. ढवळीकरांची दमछाक करण्यासाठी भाजपने गोविंद गावडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. प्रियोळ भाजप मंडळ समितीची घोषणा झाल्यानंतर गोविंद गावडे यांनी थेट मगो पक्षावर बेछूट वक्तव्यबाजी सुरू केली आहे. भाजपला मगो पक्षाची गरज नाही. फोंड्याची जबाबदारी आपण घ्यायला तयार आहे. मगो पक्ष हा बहुजनांचा असेल तर मग पक्षाचे अध्यक्षपद ढवळीकरांकडेच कसे? ते आमदार जीत आरोलकर यांच्याकडे का दिले जात नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी सुरू केली आहे. मगो सरकारचा घटक पक्ष असताना या पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर उघड आरोप करण्याची मोकळीक गोविंद गावडे यांना पक्ष नेतृत्वाच्या संमतीशिवाय मिळू शकते काय, असा सवाल आता राजकीय विश्लेषक करत आहेत.

मगोच्या वाटेला गेला तो संपला
मगो पक्षाच्या वाटेला जो गेला तो संपला. सत्ता स्थापनेसाठी मगोचा वापर करून गरज सरल्यानंतर मगोला वाकुल्या दाखवण्याची ही कृती अयोग्य आहे. मगोच्या वाटेला गेलेल्या नेत्यांची काय अवस्था झाली हे सर्वश्रृत आहे. मगोच्या वाटेला गेलेल्यांचा खात्मा झाला आहे. भाजपला मगोची गरज नसेल तर त्यांनी उघडपणे तशी भूमीका जाहीर करावी. पडद्याआड कुणाला तरी पुढे करून मगो आणि पक्षाच्या नेत्यांवर शरसंधान करण्याचा प्रकार बंद व्हावा.
राघोबा गावडे
मगो केंद्रीय समिती सदस्य

  • Related Posts

    ७ एप्रिल रोजीच शाळेची घंटा वाजणार!

    मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिका फेटाळली गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) यंदा ७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलेली याचिका अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने…

    हप्तेबाजीचा महापूर

    आता वरपर्यंत म्हणजे आम्ही देवालाही त्याचा वाटा पोहोचवतो, म्हणूनच तर हे करू शकतो, असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढीच काय ती अपेक्षा. अलिकडे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा, अंत्योदय, ग्रामोदय,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    04/04/2025 e-paper

    04/04/2025 e-paper

    ७ एप्रिल रोजीच शाळेची घंटा वाजणार!

    ७ एप्रिल रोजीच शाळेची घंटा वाजणार!

    हप्तेबाजीचा महापूर

    हप्तेबाजीचा महापूर

    03/04/2025 e-paper

    03/04/2025 e-paper
    error: Content is protected !!