बहुजनांचा “नायक” हरपला!

आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.

गोव्यात “पात्रांव” ही उपाधी मालक, साहेब किंवा उच्चपदस्थ व्यक्तीला दिली जाते. ही उपाधी केवळ अधिकाराची नव्हे, तर प्रतिष्ठेची असते. बहुजन समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित आणि पीडित राहिलेला आहे. अशा समाजाला ‘पात्रांव’ होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. रवी नाईक यांनी हा संघर्ष यशस्वीपणे पार करून दाखवला आणि बहुजन समाजही ‘पात्रांव’ बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने बहुजनांच्या ‘पात्रांव’चा अस्त झाला, असेच म्हणावे लागेल.
राज्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने भंडारी समाज हा सर्वांत मोठा समुदाय आहे. मोठा समाज असल्यामुळे मतभेद, वाद-विवाद अपरिहार्य ठरतात. तरीही या समाजाला मुख्यमंत्रीपदाचा मान केवळ रवी नाईक यांच्या रूपात एकदाच मिळाला. त्यांच्या जाण्याने भंडारी समाजात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी समाजाने आपापसातील मतभेद विसरून एकजुटीने पुढे यावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
भाजपने गोव्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही ठरावीक बहुजन नेत्यांना लक्ष्य केले गेले. भाजपला आपली जागा निर्माण करायची असल्यास या नेत्यांचे अस्तित्व संपवणे आवश्यक होते. अॅड. रमाकांत खलप यांच्याविरोधात म्हापसा अर्बन बँक प्रकरण, अॅड. दयानंद नार्वेकर यांच्याविरोधात इतर आरोप लावून त्यांना राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या सर्व डावपेचांना पुरून उरले ते फक्त रवी नाईक.
काँग्रेस सरकारमध्ये गृहमंत्री असताना ड्रग्स, पोलिस आणि राजकारणी साटेलोटे प्रकरणावरून भाजपने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले. बदनामीचा कळस गाठला गेला. परिणामी २०१२ मध्ये त्यांचा पराभव झाला. तरीही २०१७ मध्ये त्यांनी पुनरागमन केले. शेवटी भाजपलाच त्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यावे लागले. हेच त्यांच्या नेतृत्वाचे सामर्थ्य दर्शवते.
दहा वेळा विधानसभा निवडणूक लढवून सात वेळा आमदार बनण्याचा मान त्यांनी मिळवला. फोंडा आणि मडकई मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. भाजपने श्रीपाद नाईक यांना त्यांच्या विरोधात उभे करून बहुजन नेतृत्वाचे वलय संपवण्याचा प्रयत्न केला. १९९४ मध्ये रवी नाईक यांचा पराभव झाला, पण २००२ मध्ये त्यांनी श्रीपाद नाईक यांचा पराभव करून वचपा घेतला. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेच एकमेव नेते होते, जे रवी नाईक यांना बिचकत होते. वक्तृत्व नसतानाही रवी नाईक यांनी पर्रीकरांचा प्रभावी सामना केला.
शांत, संयमी आणि धीरगंभीर स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही, विनाकारण विरोधकांवर टीका केली नाही. ‘पात्रांव’ ही उपाधी त्यांना राजकीय पदांमुळे नव्हे, तर जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे मिळाली होती.
कुळ-मुंडकारांचे अधिकार, मुंडकार संरक्षण कायदा, “कसेल त्याची जमीन” आणि “राहील त्याचे घर” या धोरणांसाठी त्यांनी दिलेले योगदान गोव्याच्या राजकीय इतिहासात अजरामर राहील.
आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.

  • Related Posts

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    आगीशी खेळ नको…

    नेपाळचा इतिहास गोव्याला इशारा देतो, जनतेच्या भावना दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या, तर असंतोष आंदोलनात रूपांतरित होतो. नेपाळमध्ये “जनआंदोलन” एका दिवसात उभे राहिले नाही. अनेक वर्षे लोकांच्या मनात साचलेला असंतोष, अन्यायाची भावना,…

    You Missed

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper

    परवानगीचेही राजकारण

    परवानगीचेही राजकारण

    तरुण तेहलानी यांना टीसीपीचा दणका

    तरुण तेहलानी यांना टीसीपीचा दणका

    Governor’s Office Forwards Complaint Against Captain of Ports; Public Grievances Dept Seeks Action Report

    Governor’s Office Forwards Complaint Against Captain of Ports; Public Grievances Dept Seeks Action Report

    गोमंतकीय कलावंतांचा महाराष्ट्रात झंकार; “तो मी नव्हेच!” नाटकाच्या दौऱ्याचे कौतुक

    गोमंतकीय कलावंतांचा महाराष्ट्रात झंकार; “तो मी नव्हेच!” नाटकाच्या दौऱ्याचे कौतुक

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions