आयटी कन्व्हेन्शन सेंटर, बांधकाम कचरा प्रकल्पालाही हरकत; परवानग्या रद्द करण्याची मागणी
………………………………………………………..
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)
तुये पंचायत क्षेत्रात प्रस्तावित ३९ व्हिला आणि प्रत्येकी एक स्विमिंग पूल उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याची जोरदार मागणी रविवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली. गावाच्या पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचा विचार न करता पंचायत मंडळाने एकाच फटक्यात ही परवानगी दिलीच कशी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर समर्थक पंचायत मंडळ तुये पंचायतीवर कार्यरत असल्याने हा विषय राजकीयदृष्ट्याही गाजण्याची शक्यता आहे.
ग्रामसभेत तुये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि बांधकाम कचरा व्यवस्थापन प्रकल्पालाही विरोध करण्यात आला. गावाचा सर्वंकष वहनक्षमता अहवाल तयार होईपर्यंत नवीन व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच गोवा औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेली, मात्र वापराविना पडून असलेली जमीन मूळ मालकांना परत करण्याची मागणीही करण्यात आली.
ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र सरपंच अनिता साळगावकर अनुपस्थित होत्या. उपसरपंच मनोहर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सातपैकी केवळ तीन पंचायत सदस्य उपस्थित होते. पंचायत सदस्य अनिल हरमलकर ग्रामस्थांमध्ये बसले होते. पंचायत निर्णयप्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
गावाच्या विकासाला विरोध नाही; मात्र स्थानिकांचे हित, पाणीपुरवठा आणि पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली.







