कौस्तुभ नाईक
फोंडा-गोवा
(लेखक संशोधक आणि नाट्यशास्र अभ्यासक आहेत)
कोंकणी मराठी वाद सालाबादप्रमाणे एक दोन वेळा तरी उफाळून येतोच. कोंकणीवाले मराठीचे गोव्यातले अस्तित्व एक तर मान्य करत नाहीत किंवा सरसकट मराठी गोव्यात कधीच अस्तित्वात नव्हती असले अनैतिहासिक विधान करून मोकळे होतात. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून मराठीवाले फादर थॉमस स्टीफन्स ह्यांच्या ख्रिस्तपुराणाचे व फादर क्रुवांच्या पीटर पुराणाचे दाखले देतात. व्हॉलीबॉलसारखा असल्या ऐतिहासिक पुराव्यांचा चेंडू एका बाजूहून दुसऱ्या बाजूस परतवला जातो. ह्यावेळी निमित्त झाले आहे दामोदर उर्फ भाई मावजो ह्यांनी गोवा राजभाषा कायद्यात मराठीविषयी केलेल्या वक्तव्याचे. खरंतर असल्या चेंडू परतवण्याच्या सामन्यात भाग घेऊन काही हशील नाही पण इतिहास शास्त्राच्या निकषांवर ह्या वादात हमखास येणाऱ्या वक्तव्यांची चिकित्सा करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
२०२२ साली युगवाणी ह्या मराठी नियतकालिकाने काढलेल्या गोवा विशेषांकात भाई मावज्यांनी अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात केलेले भाषण छापून आले आहे. ‘संत नामदेव हे कोंकणीतले आद्य कवी आहेत’ ह्यापासून ‘मराठीने कोंकणीची मदत केली पाहिजे’ पर्यंतच्या रेंजची वक्तव्ये त्या भाषणात आहे. (ते वाचून एकाएकी मराठीविषयी इतक्या सौहार्दाने लिहिणाऱ्या भाईंना २०२४ साली अचानक काय झाले असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल नाही.)
सदर भाषणात मावज्यांनी एक माहिती दिली आहे कि १६८४ साली पोर्तुगीज व्हाईसरॉयने एक फर्मान काढून कोंकणीवर बंदी आणली व ती बंदी तब्बल सव्वादोनशे वर्षे म्हणजे १९१० पर्यंत कायम होती. ते वाचून एक क्षण थांबलो. सोळाव्या-सतराव्या शतकातला इतिहास हा माझा संशोधन प्रांत नसला तरी माझ्या पीएचडीच्या निमित्ताने त्या काळाचा इतिहास मी काहीसा वाचलाय. सव्वा दोनशे वर्षे कोंकणीवर बंदी म्हणजे जरा अतिशयोक्तीच वाटली. भाईंचे भाषण काही अकादमिक निबंध नाही त्यामुळे तिथे संदर्भ दिले नव्हते. इंटरनेटवर शोधून पाहिले तर बऱ्याच लोकाभिमुख लेखांत १६८४ ह्या वर्षाचा व त्या फर्मानाचा उल्लेख आढळतो पण नेमके कोणते फर्मान ते कोणीच देत नव्हते. शेवटी क्योको मात्सुकावा ह्या जपानस्थित संशोधिकेने गोव्याच्या भाषिक अस्मितेवर जो निबंध लिहिला आहे त्यात संदर्भ सापडला. ह्या फर्मानाचा मूळ स्रोत ज्योकीं कुंया रिव्हारा ह्यांनी Ensaio Histórico da Língua Concani ह्या कोंकणीच्या इतिहासावर पोर्तुगीज भाषेतून १८५७ साली लिहिलेल्या निबंधात होता. (ह्या निबंधाचा इंग्रजी अनुवाद थिओफिलस लोबो ह्यांनी केला आहे जो अ.का. प्रियोळकर ह्यांनी प्रकाशित केलेल्या ‘The Printing Press In India’ ह्या पुस्तकात एका परिशिष्टांतर्गत छापला आहे.)
रिव्हारा त्या निबंधात नेमके काय म्हणतात ते तपासताना काही गोष्टी समजल्या. १६८४ साली कोंकणीवर बंदी घालण्यात आली हे बरोबर आहे पण हि अपूर्ण माहिती आहे. सदर निबंधात १६८४च्या आधी निघालेल्या अनेक फर्मानांचा तपशील रिव्हारा देतात ज्यात गोव्यात धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या मिशनऱ्यांनी स्थानिक भाषा शिकणे व स्थानिक भाषेत लोकांशी वार्तालाप करणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले आहे. रोमन कॅथॉलिक चर्च, पोर्तुगीज दरबार, गोव्यात सरकार चालविणारे इश्तादो द इंडियाचे अधिकारी, आणि गोव्यात धर्मप्रसारासाठी आलेले विविध ऑर्डर्सचे मिशनरी असे बरेच घटक ह्या व्यवहारात सहभागी आहेत. सोळाव्या-सतराव्या शतकातील गोव्याच्या इतिहासाचा धांडोळा घ्यायचे झाले तर ह्या सर्व घटकांमधला अंतर्गत सत्तासंघर्ष समजणे गरजेचे आहे. त्यामुळे हे फर्मान केवळ एका कार्यालयातून निघून ते सव्वादोनशे वर्षे सातत्याने राबवले गेले असे काही नाही. तर ह्या प्रक्रियेत सतत होणारा पत्रव्यवहार, भाषेमुळे धर्मप्रसारात व प्रशासनात निर्माण होणाऱ्या अडचणी वगैरेंबाबतीत उहापोह होत असताना आपल्याला दिसतो. सतराव्या शतकात स्थानिक भाषांवर बंदी आणणं हा एक अपवादात्मक आणि काहीसा आश्चर्यचकित करणारा निर्णय म्हणावा लागेल. ह्याचे कारण म्हणजे चर्च कौन्सिलने स्थानिक भाषेत धर्मप्रसार करावा असे ह्याआधीच सांगितले आहे. त्याचाच भाग म्हणून ख्रिस्तपुराण आदी ग्रंथांची निर्मिती झाली नुकतीच होऊन गेलेली आहे. डॉ अनन्या चक्रवर्ती ह्यांच्या निबंधात सतराव्या शतकात धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती ब्राह्मणांत ह्या ग्रंथाचे मोठ्या आनंदाने स्वागत होऊन त्याचे सार्वत्रिक वाचन होत असल्याचे त्या मांडतात.
मग १६८४ साली नेमके काय घडले ज्यावरून कोंकणीतून धर्मप्रसार आणि कोंकणीच्या वापरावर बंदी घालण्यात आली? कारण स्थानिक आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात येईपर्यंत ख्रिस्ती मिश्नर्यांमध्ये एकप्रकारची सुस्ती येऊन त्यांना स्थानिक भाषा शिकण्यात व त्यातून प्रचार करण्यात रस नाहीसा झाला. त्यांना तो आधीही होता असे नाही. स्थानिक भाषांतून धर्मप्रसाराचे काम करणे ते काहीश्या निरुत्साहानेच करत. व्हाइसरॉयने वारंवार सांगून सुद्धा ते त्यांना न जुमानता स्थानिक भाषा शिकत नसत व शेवटी कंटाळून मिशनऱ्यांना स्थानिक भाषा शिकण्याची सक्ती करण्यापेक्षा स्थानिक लोकांना पोर्तुगीज शिकवणे अधिक सोपे जाईल ह्या विचाराने व्हाइसरॉयने हा निर्णय घेतला हे खुद्द रिव्हाराच आपल्याला त्या निबंधात सांगतात. १५१० ते १६८४ हा एकशे चौऱ्याहत्तर वर्षांचा काळ आहे. ह्याकाळात कोंकणीचे स्थान पोर्तुगीज दरबारी काय होते किंवा ह्या दरम्यान आलेल्या फर्मानांमुळे कोंकणीवर नेमका काय परिणाम झाला ह्याविषयी नेमकी माहिती असल्याशिवाय अश्या फर्मानांतून राबविलेल्या बंदीचा परिणाम काय आणि किती होता हे नेमकेपणाने सांगणे अवघड. त्यासाठी ह्या एका फर्मानामुळेच कोंकणीची वाढ खुंटली असे ठोस विधान करणे इतिहासशास्त्राला धरून नाही त्यामुळे निदान मी तरी ते करणार नाही. अश्या स्वरूपाची फर्माने पुढच्या वर्षातही परत परत जारी केलेली आपल्याला आढळतात व त्यामुळे त्या फर्मानांची अंमलबजावणी कितपत चोख होती ह्याविषयी शंका घ्यायला वाव आहे असे मात्सुकावांचे म्हणणे आहे. तात्पर्य १६८४ सालच्या एका फर्मानाने गोव्यातून कोकणी समूळ नष्ट झाली हे सूतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे.
पण सोयीसाठी एकवेळेला हे जरी खरं मानलं कि १६८४सालच्या फर्मानामुळे कोंकणीचा वापर गोव्यात एकहाती बंद झाला तर दुसरा तार्किक प्रश्न उपस्थित राहतोच. १६८४ सालापर्यंत आणि तिथून पुढे ७९ वर्षापर्यंत पोर्तुगीज अखत्यारीत केवळ बार्देस, तिसवाडी, मुरगांव आणि सासष्टी हेच भाग होते. त्यांना आपण जुन्या काबिजादी म्हणतो. कोंकणी हि जर समग्र गोव्याची भाषा असली तर निदान नव्या काबिजादींमध्ये ती टिकून राहायला पाहिजे होती. तिथे तर कोंकणीविरुद्ध कोणतेही फर्मान काढल्याचे ऐकिवात नाही. नव्या काबिजादींतल्या ग्रामसंस्थांचे व्यवहार हे मोडी लिपीत लिहिलेल्या मराठीतून चालत. ते तसेच चालू राहावे असे पोर्तुगिजांनीच काढलेल्या १७६६च्या हुकूमनाम्यात लिहिले आहे. हा हुकूमनामा नव्या काबिजादींतल्या प्रत्येक ग्रामसंस्थांच्या नोंदवहीत उतरवून घेतला आहे. मोडी मराठीत चाललेले हे व्यवहार एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू राहिले हे गोव्यातल्या अभिलेखागारात असलेल्या रेकॉर्ड्सवरून दिसून येते. मग नव्या काबिजादींत कोंकणी का वापरात आली नाही? उलटपक्षी नव्या काबिजादींच्या समावेशामुळे जो प्रशासकीय पेच पोर्तुगीज सरकारपुढे निर्माण झाला त्यावर उपाय म्हणून मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा पोर्तुगीजांनी दिला. डॉ. रोशेल पिंटो ह्यांच्या ‘बिटवीन एंपायर्स’ ह्या पुस्तकात ह्या प्रक्रियेविषयीचा संदर्भ आलेला आहे.
ह्यानंतर पोर्तुगीज सरकारचा व्यवहार पोर्तुगीज व मराठी भाषेतून चालू झाला व नव्या काबिजादींमध्ये मराठी शाळा सुरु झाल्या. ८ ऑगस्ट १८४३ साली काढलेल्या परिपत्रकाच्या प्रस्तावनेत तत्कालीन पोर्तुगीज सरकारने मराठी शाळा स्थापन करण्यामागची भूमिका विषद केली आहे. मराठी भाषेत मोठ्या संख्येने व्यावहारिक कागदपत्रे होती ज्यावरून न्यायालयीन, आर्थिक तसेच प्रशासकीय निर्णय घेणे अवलंबून होते. अश्या कागदपत्रांचे वाचन तसेच पोर्तुगीज भाषेत अनुवाद करू शकणारे लेखनिक आणि अनुवादक सरकार दरबारी नियुक्त करण्याची गरज पोर्तुगीज सरकारला भासू लागली. ह्याअर्थी नव्या काबिजादींमध्ये मराठी हीच स्थानिक व अधिकृत भाषा होती म्हणून ह्या मराठी शाळा पोर्तुगीजांनी सुरु केल्या हे सिद्ध होते.
सखाराम नारायण वाघ हे पोर्तुगीज दरबारी नियुक्त झालेले पहिले मराठी शिक्षक आणि अनुवादक. त्यांच्यानंतर सूर्याजी आनंद राव देशपांडे ह्यांची तिथे वर्णी लागली. सूर्याजी रावांनी आपल्या कार्यकाळात पोर्तुगीज भाषेत मराठीचे व्याकरण लिहिले, व मोल्स्वर्थ शब्दकोशाचा आधार घेऊन पोर्तुगीज मराठी शब्दकोशाची निर्मिती केली. ह्या कोशाच्या पहिल्या खंडाच्या मराठी प्रस्तावनेत त्यांनी गोव्यातल्या मराठी भाषेच्या स्थानाविषयी सूचक लेखन केलेले आहे. ते लिहितात –
“पुढे नवीन काबिजाद या नामेंकरुन जे प्रांत आहेत ते एकामागे एक आमच्या पोर्तुगेज सरकारच्या ताब्यांत आले तोपासून हिंदुप्रजेचें मान वाढले, त्यांचे सर्व धार्मिक संप्रदाय व इतर हक्क संरक्षण करण्याचे वचन देऊन सदर्हू प्रांतातील प्रजेला सरकाराने सन १७६३ पासून १७८८ पर्यंत आपल्या ताब्यांत आणिलें, तावत्कालापासून सरकारची मेहरबानीची नजर हिंदुलोकांवर होऊ लागली, तेव्हा त्यांचे शिक्षेविषयी आगर कल्याणाविषयी सरकारने जरूर तितकी तजवीज केली, तथापि व्हावी तशी झाली नव्हती, ती अलीकडे लोकांस पोर्तुगीज नगरकरी असे हक्क मिळाल्यापासून होऊ लागली, आणि मराठी पोर्तुगीज लेखन वाचन शिकविण्याबद्दल प्रथमतः सन १८४३ साली या शहरांत सरकारने मराठी शाळा स्थापिली, या शाळांची संख्या आता वाढत चालली आहे, व पुढेही उत्तरोत्तर वाढत जाईल आणि हिंदुलोकांविषयी बरीच तजवीज होईल असी आशा आहे.”
नव्या काबिजादींच्या समावेशानंतर हिंदू समाजाला – विशेषतः उच्चवर्णीय हिंदू समाजाला – पोर्तुगीज दरबारी सरकारी नोकरीची वाट मराठीच्या ज्ञानामुळे मोकळी झाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवून त्यांनी पोर्तुगिजांबरोबर संगनमत करून आपले जातीवर्चस्व कायम केले. त्यामुळे गोव्यातील सारस्वतांना मराठीचे वावडे नव्हते हे स्पष्ट आहे.
सारस्वतांची भाषा मराठी नसून कोंकणी आहे हा मुंबईत बसून लावलेला शोध आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सारस्वतांची मूळ अस्मिता हि कोंकणी भाषेशी निगडित आहे अश्या स्वरूपाचे लिखाण आढळते. वामन वर्दे वालावलीकरला मुंबई वास्तव्यास असताना कोंकणीच्या वेगळेपण जाणवते. (पुढे रवींद्र केळेकार आणि दामोदर मावजो ह्यांच्याही लेखनात कोंकणीचे वेगळेपण त्यांना मुंबईपुण्यात जाऊन जाणविल्याचे लिहिले आहे. योगायोगाने त्या दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशी मुक्कामास राहून कोंकणीच्या वेगळेपणासंबंधी दृष्टांत होणाऱ्यांना पुढे ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो असे मिथक प्रचलित करण्यास वाव आहे. कोंकणी साहित्यविश्वातल्या ज्ञानपीठ इच्छूकांनी नोंद घ्यावी.)
हे वेगळेपण जाणवणे काहीसे चमत्कारिक वाटते म्हणून त्याची चिकित्सा करणे क्रमप्राप्त आहे. केवळ सारस्वतच नव्हे तर गोव्यातल्या इतर ज्ञातिवर्गातली बरीच मंडळी मुंबईत वास्तव्यास होती. मग त्यांना कोंकणीचे हे वेगळेपण का जाणवले नाही? भंडारी समाज, मराठा गायक समाज इत्यादी गोमंतकीय ज्ञातिसंस्था मुंबईत सक्रिय होत्या पण ह्या सर्व समूहांनी आपली अस्मिता मराठा आहे असे घोषित केले होते. प्रा. पराग परोबोंच्या पुस्तकात ह्याविषयी सविस्तर संशोधन आलेले आहे (सुज्ञ वाचकांनी ते पुस्तक जरूर वाचावे. इंग्रजीबरोबर ते आता मराठीतही उपलब्ध आहे.) मग प्रश्न येतो तो मुंबईतल्या गोमंतकीय सारस्वतांना कोंकणी आपली (व हेटाळणी करण्याइतपत मराठी परकी) का वाटावी? त्यासाठी मुंबईस्थित ब्राम्हणांमधला अंतर्गत ज्ञातीकलह कारणीभूत होता.
डॉ उर्मिला पाटील ह्यांनी टेक्सस विद्यापीठात सादर केलेला पीएचडी प्रबंध आणि डॉ जेसन कीथ फर्नांडिस ह्यांनी वालावलीकरावर लिहिलेल्या चरित्रात्मक निबंधावरून मुंबईस्थित सारस्वत ज्ञातीसमूहाने कोंकणी भाषेची कास का धरली हे समजण्यास मदत होते. मुंबईस्थित शेणव्यांना स्थानिक चित्पावन समूहातील लोक ब्राह्मण मानत नव्हते. १८६९ साली उद्भवलेल्या मालवणकर-वागळे वादामुळे शेणव्यांचे ब्राह्मणत्व ब्रिटिश कोर्टात पोचून निकाल वागळेंच्या बाजूने लागला. पण ह्या वादामुळे चित्पावन-सारस्वत ज्ञातीकलह चव्हाट्यावर आला. पुढे रा. गो. भांडारकरांना ते ब्राह्मण नसल्याची सबब देऊन शास्त्रार्थ सभेत भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. चित्पावनांकडून येणाऱ्या ह्या आव्हानामुळे आपले ब्राह्मणत्व सिद्ध करणे हि शेणव्यांची तातडीची गरज होती. महाराष्ट्रात ब्राह्मणत्वाच्या सीमा ठरविण्यात चित्पावन अग्रेसर होते. ती मक्तेदारी मोडीत काढणे गरजेचे होते. तसेच ह्या काळात भाषा हा जातवर्चस्व स्थापन करण्यासाठीचा एक प्रमुख घटक होता. ब्रिटिश भारतात भाषेविषयी बरीच उलथापालथ होत होती. शब्दकोश व व्याकरण निर्माण करून भाषेचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु होती. ब्राह्मणांची बोली तीच प्रमाण, शुद्ध भाषा ह्या तत्वावर काम चालले होते. मराठीत ह्याची सूत्रे चित्पावनांकडे होती. चित्पावनांबरोबर असलेल्या आंतरजातीय कलहातूनच मुंबईतील शेणव्यांना स्वतःची ब्राह्मण अस्मिता हि चित्पावनांपेक्षा वेगळी आहे आणि त्यांच्या अंमलाखाली असलेल्या मराठी भाषेऐवजी आपली भाषा कोंकणी आहे असे भासवावे लागले असे फर्नांडिस आणि पाटील ह्यांच्या संशोधनातून दिसून येते.
कोंकणीशी आपली अस्मिता जोडून घेण्यात काही शेणव्यांचा विरोधही होता. मराठीच्या बाजूने रघुनाथ तळवडकरांसारखे काही सारस्वत वालावलीकरच्या विरोधातही उभे राहिले. पण स्वातंत्र्योत्तर काळात वालावलीकरला कोंकणीचा आद्यपुरुष घोषित केल्याने तोच मतप्रवाह ऐतिहासकीदृष्ट्या प्रबळ बनवला गेला. चित्पावनांकडून होणाऱ्या हेटाळणीमुळे कोकण प्रदेश हे सारस्वतांचे उगमस्थान आहे आणि त्यांची भाषा कोंकणी आहे असे वालावलीकर लिहू लागला. (हि प्रक्रिया अजून मोठी व क्लिष्ट आहे. विस्तारभयास्तव इथे काहीसे सुलभीकरण केलेले आहे. इच्छुकांनी फर्नांडिस ह्यांचा वालावलीकरवरचा निबंध व पाटील ह्यांचा डॉक्टरेट प्रबंध वाचावा. तसेच फ्रँक कॉनलोन, सुझन बेली, पॉली ओ हॅनलॉन इत्यादींचे संशोधन वाचावे जेणेकरून ‘जाती’ ह्या संकल्पनेबद्दल महाराष्ट्र प्रदेशी काय खल चालला होता ह्याचे आकलन होण्यास सोपे जाईल.)
दुसरा प्रश्न – गोमंतकीय बहुजनवर्गाची भाषिक भूमिका मराठीच्या बाजूने का व कुठून आली? ह्यात अजून बरेच संशोधन करण्यास वाव आहे व तूर्तास तरी ह्याविषयी केवळ काही प्राथमिक तर्क मांडू शकतो. नमूद केल्याप्रमाणे प्रा. पराग परोबोंच्या पुस्तकात गोमंतकीय बहुजनवर्गाच्या मराठाकरणाच्या प्रक्रियेविषयी माहिती आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम केल्याचा इतिहास क्लेम करून त्यांनी स्वतःला मराठा म्हणविणे सुरु केले होते. तसेच ह्यात जोतीराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे, तुकाराम (तात्या) पडवळ इत्यादी विचारवंतांनी प्रसार केलेल्या बहुजनवादी चिंतनाचाही भाग असावा असे वाटते. आपल्या जातीय शोषणाला प्रतिकार करण्याची वैचारिक मांडणी मराठीमधून होत असल्याने त्यांना मराठी जवळची वाटली असावी. जातीय विषमतेच्या पाशातून बाहेर पडण्यासाठी गोमंतकीय बहुजनवर्गाचे जे प्रयत्न चालले होते त्याचे मुंबई हे एक प्रमुख केंद्र होते. तिथे स्थायिक झालेल्या गोमंतकीयांकडून गोव्यातील बहुजनवादी चळवळीला आर्थिक आणि इतर मदत मिळत होती. सामाजिक समतेचे एक व्यापक भान गोमंतकीय बहुजनवर्गाला मराठीतून मिळाले ह्याबद्दल दुमत असू शकत नाही. गोमंतकीय बहुजनवर्गाने कोंकणीच्या मागे उभे राहण्यासाठी कोंकणीने त्या वर्गाला असा कोणता विचार दिला आहे? निदान वसाहतकालीन चर्चांमध्ये असा ठोस विचार हिंदू बहुजनवर्गासाठी कोकणी भाषिक चळवळीने दिला असे आढळत नाही. ‘गावड्यांक शिकोवन पंडित करूया’ हा तो विचार निश्चितच असू शकत नाही.
प्रस्तुत लेखात आतापर्यंत वसाहतकालीन भाषिक वादाचाच परामर्श घेण्यात आला आहे. गोवा स्वातंत्र्यानंतर भाषेच्या चळवळीची समीकरणे बदलली. त्याचा वेगळा लेखाजोखा केला पाहिजे. सदर लेखाचे ते ध्येय नाही. त्याचे अवलोकन स्वातंत्र्योत्तर काळातल्या देवनागरी कोंकणी चळवळीने तरी गोमंतकीय समाजाला कोणता विचार दिला आहे ह्या मुद्द्यावर करणे गरजेचे आहे. कोंकणी साहित्यात आजही परिवर्तनवादी, आधुनिक मूल्यांची पाठराखण करणाऱ्या साहित्याची वानवा आहे कारण तिथले लेखक हे सतत प्रादेशिकता सिद्ध करण्यात गुंतलेले असतात. ‘गांवगिऱ्या वाठारांचे’ उदात्तीकरण करण्यापलीकडे क्वचितच ते साहित्य जाते. गाव हि संस्था जातिव्यवस्थेने पुरती जखडली आहे आणि त्यापासून दूर गेले पाहीजे असे डॉ. आंबेडकर म्हणायचे. कोंकणीत डॉ आंबेडकरांच्या लेखनाचा अनुवाद झाला आहे का? किमान राजाराम पैंगीणकरांच्या ‘मी कोण’ ह्या आत्मचरित्राचा अनुवाद तरी कोंकणीत यायला पाहिजे होता जेणेकरून आज मराठीपासून फारकत घेतलेली जी गोव्यातली तरुण पिढी आहे तिला गोव्यातल्या जातिव्यवस्थेचे ऐतिहासिक स्वरूप कळले असते. कोकणीचे आद्यपुरुष म्हणवले जाणारे वालावलीकर तर देवदासी प्रथा चालूच राहावी ह्या विचाराचे होते. कोंकणीने जाती उच्चाटनासाठी कुठला आधुनिक विचार दिला आहे? दिला असता तर विष्णू वाघ ह्यांच्या सुदीरसूक्त ह्या काव्यसंग्रहाची जी अवहेलना साहित्यिक म्हणवणाऱ्या कोंकणीवाद्यांकडून झाली ती कदाचित झाली नसती. गोव्यातल्या जातीय विषमतेवर कोंकणी साहित्य चळवळीची भूमिका काय? हे कळण्यासाठी कोंकणी साहित्याचे सोशल ऑडिट करणे गरजेचे आहे. एक लिटररी इकॉलॉजी म्हणून सामाजिक विषमतेवर कोंकणीने गोमंतकीय समाजात परिवर्तनाच्या कुठल्या शक्यता प्रस्थापित केल्या हे कळले पाहिजे.
निमित्त मावजोंच्या वक्तव्याचे असले तरी मूळ मुद्दा तो नाही. मराठी आणि कोंकणी ह्या दोन भाषा गोमंतकीय समाजात काय जबाबदाऱ्या पार पाडत होत्या आणि कोंकणी मराठी वादामुळे त्या जबाबदाऱ्यांचे पुढे काय झाले ह्याचा पंचनामा अजून होणे बाकी आहे. केवळ कोंकणीच्या वैचारिक ‘दायजावर’ पोसलेला एकतरी कोंकणी विचारवंत गेल्या साडेतीन दशकांत हे करू शकला आहे का? गोमंतकातील मराठीवाद्यांना महाराष्ट्रधार्जिणे म्हणून ट्रोल करण्याइतके ते सोपे नक्कीच नाही. ते केले तर कदाचित अनेक प्रयत्नांविपरीतही गोव्यात मराठीच्या बाजूने अजूनही लोक का उभे राहतात ह्याचे मर्म कोंकणीवाद्यांना कळेल.
–कौस्तुभ नाईक
अभ्यासपूर्ण लिखाण.
छान लेखच खुप छानच
गोव्यातील मराठीच्या ललाट पटलावर कौस्तुभे कस्तुरीचा लावियेला तिळा…
लेख,संदर्भ देऊन अभ्यासपूर्ण लिहिला आहे. ज्ञानात भर पडेल.
अत्यंत अभ्यासपूर्ण! “गांवगीऱे वाठार” (आणि लोककला) या पलीकडे कोकणी साहित्य फारसे गेलेले दिसत नाही.हे निरिक्षण अचूक!
कौस्तुभ सुंदर व अभ्यासपूर्ण लेख 👌👌👌
जबरदस्त लिखाण. एवढा अभ्यास करावा लागतो, तोंड उघडण्यापूर्वी एवढी समज शहाण्या माणसाला असावी. नाहीतर ज्ञानपीठवाले आणि माझ्यासारखे धान्यपिठवाले यात फरक तो काय राहिला? 🙏
व्वा! विष्णूचा वारस मिळाला.
अत्यानंद जाहला…..
कौस्तुभ अभ्यासाचं आणि धैर्याचे कौतुक आहे मित्रा.
यशस्वी भव:
कीर्तिवंत भव:
चिरंजीवी भव:
व्वा!! सडेतोड आणि अभ्यासपूर्ण लेख!!.. अशाच सडेतोड आणि अभ्यासपूर्ण लेखकांची गरज आहे. कौस्तुभ, लिहीत रहा.
व्वा!! कौस्तुभ,सडेतोड आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहेस. तुझी लेखणी अशीच तळपत राहो.
जबरदस्त..ह्या लेखामुळे अज्ञानींच्या डोक्यात थोडा तरी प्रकाश पडेल अशी अपेक्षा करूया.खरंच दूध का दूध पानी का पानी सिद्ध झाले.फार अभ्यासपूर्ण लेख.
मुद्देसूद आणि ऐतिहासिक संदर्भासहित केलेले उत्तम लिखाण! भाषा सुद्धा दर्जेदार!
फारच अभ्यासपूर्ण आणि पारदर्शी विचार मांडणारा लेख.विषयाचे सखोल चिंतन करून मांडलेले निष्कर्ष हे या लेखाचे खरे यश आहे…तर तम भाव न बाळगता संदर्भ देत उभे केलेले वास्तव हे डाॅ.कौस्तुभच्या लेखनाचे खरे यश आहे…खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..
खुप छान…
अभिनंदन.